लखनौ - हरदोई येथील मणिलाल (५०) यांचा धीर सुटला होता. सुमारे वर्षभरापूर्वी एका अपघातात त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड निखळले होते. कसेतरी हाड जोडले गेले पण ते सुमारे ६ इंच लहान झाले. त्याची जखम आतून भरली नव्हती. जीव वाचवण्यासाठी त्यांचा पाय कापावा लागेल, असं डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून कुटुंबीय घाबरले आणि अनेक ठिकाणी वणवण फिरून लखनौला पोहचले.
लखनौमध्येही अनेक खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना पाय कापण्याचा सल्ला दिला. त्यांनी ते पूर्ण करून घेतले असते पण त्याची किंमतही खूप जास्त असल्यानं आर्थिक दुर्बल मणिलालच्या आवाक्याबाहेरचे होते. सुदैवाने सल्ला घेण्यासाठी त्यांनी बलरामपूर हॉस्पिटल गाठले. इथे डॉ. ए.पी. सिंग यांच्या ओपीडीमध्ये त्यांनी पाय दाखवला. इतर डॉक्टरांनी दिलेला पाय कापण्याचा सल्लाही मणिलाल यांनी डॉक्टरांना सांगितला. पण डॉ. ए.पी. सिंग यांनी त्यांना दिलासा देत एक तंत्रज्ञान आहे जे प्रभावी झाल्यास त्याचा पाय वाचू शकतो असं म्हटलं.
मणिलाल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे रशियाच्या इलिझारोव्ह तंत्रज्ञानाने त्याच्या पायाच्या हाडात इम्प्लांट टाकण्यात आले आणि त्याला रॉडने घट्ट करण्यात आले. यानंतर, दररोज हळूहळू ते सैल केले जाते जेणेकरून हाडांची वाढ होऊ शकते. अशा प्रकारे, त्याच्या पायाचे हाड १८ सेमी पर्यंत वाढवणे शक्य झाले.
या संपूर्ण उपचारासाठी सुमारे ११ महिने लागले. हे उपचार खासगी रुग्णालयात केले असते तर सुमारे १५ लाख रुपये खर्च आला असता. पण मणिलाल यांच्याकडे आयुष्मान कार्ड असल्याने त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. आता स्वत:च्या पायावर उभे राहून सामान्य जीवन जगण्याची मणिलाल यांना आशा आहे.