नवी दिल्ली-
शेतीत आता युवांच्या एन्ट्रीमुळे शेतकऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडला आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी पारंपारिक पद्धतीनं शेती करत होते. याआधारे शेतकऱ्याचं आणि कुटुंबीयांचं पोट भरायचं. पण मोठा नफा काही मिळत नसे. पण शेतीत नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकरी आता जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या शेतीकडे वळले आहेत. बांबूची लागवड देखील याचच एक उदाहरण आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात बांबूच्या शेतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बांबूच्या लाकडाचा वापर कार्बनिक कपड्यांपासून ते सजावटीपर्यंत तसंच आवश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे बांबूला बाजारात चांगली मागणी असते. बांबूच्या शेतीतून सलग ४० वर्ष तुम्ही नफा कमावू शकता. तसंच या शेतीसाठी शेतकऱ्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही.
सरकारकडून मिळते अनुदानबांबूच्या शेतीसाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं. प्रतिहेक्टर जवळपास १५०० झाडं लावली जातात. तर याची वाढ जवळपास ३ ते ४ वर्षात पूर्ण होते. यामुळे तुम्ही एका हेक्टरमध्ये एकूण ४ लाख रुपये इतका नफा तुम्ही सहजपणे कमावू शकता.
शेतीसाठी जागा जास्त माती किंवा अधिक रेतीची असता कामा नये. यात २ फूट खोल आणि २ फूट रुंद खड्डा खोदून यात रोप लागवड करू शकता. बांबूच्या लागवडीवेळी तुम्ही शेणखताचा देखील वापर करू शकता. लागवडीनंतर रोपाला तातडीनं पाणी द्या आणि महिनाभर दररोज पाणी द्या. ६ महिन्यांनंतर दर आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी चालतं.
बांबूच्या झाडाचे फायदेबांबूचा वापर फर्निचर बनवण्यातही कामी येतो. याशिवाय किचनमधील वस्तू जसं की प्लेट, चमचे बांबूपासून बनवले जातात. दिसायलाही ते आकर्षक दिसतात. तसंच याचा वापर आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून इतर धातूंनी बनलेल्या वस्तूंपेक्षा अधिक फायदेशीर मानला जातो. बाजारात बांबूपासून बनवलेल्या बाटल्या आणि ग्लास देखील उपलब्ध आहेत. यात पाणी थंड राहण्यात मदत होते आणि पाणी लवकर दूषीत देखील होत नाही.