'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 07:31 PM2020-01-12T19:31:48+5:302020-01-12T19:39:18+5:30
भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेलं पुस्तक वादात
मुंबई: भाजपानं प्रकाशित केलेलं 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असं म्हणत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुस्तकावर तातडीनं बंदी घालण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील नव्या पुस्तकावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे.
'त्यांची (मोदींची) तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. भाजपाच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचेही एक खासदार उपस्थित होते. या पुस्तकावर राष्ट्रीय अध्यक्षांनी ताबडतोब बंदी आणली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे हे बोलण्याचा मला अधिकार आहे,' अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचं आज नवी दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात प्रकाशन झालं. भाजपाशी संबंधित जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावरुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. 'आम्ही या प्रवृत्तीचा निषेध करतो. भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज कधीच कळले नाहीत. महाराजांनी रयतेसाठी आयुष्य झिजवलं. शेतकऱ्यांसाठी खजिना रिता केला. त्यांची तुलना मोदींशी करणं ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. त्याबद्दल भाजपानं माफी मागितली पाहिजे', अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी केली.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पटत नाही मनाला; जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
छत्रपती शिवाजी महाराज सूर्य होते. ज्यांच्याशी त्यांची तुलना होत आहे ते साधे काजवेदेखील नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. प्रत्येकानं स्वत:ची लायकी ओळखायला हवी. जगातील कोणत्याही राष्ट्रप्रमुखाची इतकी बौद्धिक अधोगती झाली नसेल, असं आव्हाड म्हणाले.
मोदींची छत्रपतींशी तुलना?; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचं भाजप नेत्यांकडून प्रकाशन
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपाला खोचक टोला लगावला. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा', असं म्हणत राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला.