ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - देशाच्या विविध भागात भरणा-या पशू बाजारांसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत. पशू बाजारात कत्तलीसाठी प्राण्यांची खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी आणली आहे. पशू कायद्यातंर्गत पर्यावरण मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेमध्ये नव्या नियम लागू केले आहेत.
प्राण्यांबरोबरची क्रूरता रोखण्याच्या उद्देशाने पर्यावरण मंत्रालयाने ही नवी अधिसूचना काढली आहे. गोवंशीय प्राणी आणि उंटांना हे नियम लागू असतील. मांस शिजवण्यासाठी मोठया प्रमाणावर प्राण्यांची कत्तल केली जाते. नव्या नियमामुळे कायदेशीर परवाने असलेले कत्तलखानेही अडचणीत आले आहेत.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात पशू बाजार समितीची स्थापना करण्यात येणार असून, सध्याच्या अस्तित्वात असलेल्या प्रत्येक पशू बाजाराला तिथे आपली नोंदणी करावी लागेल. या पशू बाजारांमध्ये प्राण्यांसाठी काही सुविधा ठेवाव्याच लागतील.
धडधाकट जनावरे प्राणी बाजारात येणार नाहीत ही बाजार समितीच्या सचिवाची जबाबदारी असेल असे अधिसूचनेत म्हटले आहे. जनावराला पशू बाजारात आणल्यानंतर कत्तलीसाठीआणले नाही हे मालकाला लिखितमध्ये लिहून द्यावे लागेल.
प्राण्याच्या मालकाला आपले नाव, संपूर्ण पत्ता लिहून द्यावा लागेल तसेच सोबत फोटोकॉपीचा पुरावाही जोडावा लागेल. प्राणी कल्याणासाठी ही अधिसूचना काढल्याचे पर्यावरण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.