ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 4 - अजमेरमधील प्रसिद्धी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यात सुफी मौलवींनी देशभरात गोमांसावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच त्यांनी ही मागणी केली आहे. गोमांस खाणं, बाळगणं, विक्री करणं व खरेदी करण्याच्या आरोपांमुळे मुस्लिम तरुणांवर होणा-या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मौलवींनी संपूर्ण देशात गोमांस बंदीची मागणी केली आहे.
गोमांसमुळे देशातील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांमधील सुसंवाद कमी होत आहे, असेही सूफी मौलवींनी म्हटले आहे. अजमेर दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुअल अबेदीन अली खान यांनी सांगितले की, 12 व्या शतकातील या दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या 805व्या उरूस समारोप कार्यक्रमानिमित्त गोमांस बंदीची मागणी करण्यात आली आहे.
गोमांसमुळे देशातील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांमधील सुसंवाद कमी होत आहे, असेही सुफी मौलवींनी म्हटले आहे. अजमेर दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुअल अबेदीन अली खान यांनी सांगितले की, 12 व्या शतकातील या दर्ग्यात आयोजित करण्यात आलेल्या 805व्या उरूसनिमित्त गोमांस बंदीची मागणी करण्यात आली आहे. कोट्यवधी मुस्लिमांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि देशभरात गोमांसवर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मंजूर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन औलिया दर्ग्यासह कर्नाटकमधील गुलबर्गा शरीफ, आंध्र प्रदेशचे हलकट्टा शरीफ आणि नगौर, बरेली, कलियार, भागलपूर, जयपूर आणि फुलवारी येथील दर्ग्यामधील मौलवी यावेळी सहभागी झाले होते.
नुकतेच उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारने अवैध कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, राजस्थान, गुजरात आणि झारखंड व अन्य भाजपाशासित राज्यांमध्येही अवैध कत्तलखान्यांवर बंदी लागू होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयानंतर सुफी मौलवींनी गोमांसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
कत्तलखाने बंद झाल्यानंतर लाखो हिंदू व मुस्लिम लोकं बेरोजगार होतील मात्र या दोन्ही समाजात कायमस्वरूपी चांगले संबंध प्रस्थापित होतील, असे मत मौलवींकडून मांडण्यात आले आहे. मुस्लिम व्यक्तीच मांसाहारी आहे, असा समज आहे. पण ही बाब खरी नाही, असे कर्नाटकच्या ख्वाजा बंदा नवाज दर्ग्याच्या सज्जादानशीं मोहम्मद शब्बीरुल हस यांनी सांगितले.
"हिंदू गाईला आई मानतात आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या भावनांचा सन्मान करणं हे इस्लामच्या मूळ सिद्धांतापैकी एक आहे", असे अजमेर दर्ग्याचे दिवाण म्हणाले. तसंच "जोपर्यंत आमची गोमांस बंदीची मागणी मान्य नाही होत, तोपर्यंत आमच्या भूमिकेच्या बाजूनं उभं राहावं", असं आवाहनही त्यांनी हिदूंना केले आहे.