अहमदाबाद, दि. 6- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज या ऑनलाइन गेमवर गुजरात सरकार लवकरच बंदी आणणार आहे. या खेळावर बंदी आणण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याबाबतचे उपाय सुचविण्याचे आदेश गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाला दिले आहेत. तसंच गरज पडली तर या खेळावर बंदी आणण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी आधीच गृह विभाग, आयटी मंत्रालय आणि शिक्षण विभागाला पत्र लिहून सोशल मीडियातून ब्ल्यू व्हेल गेम हटविण्यासाठी पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काम सुरू झालं आहे, असं गृह विभागाचे सचिव मनोज अग्रवाल यांनी सांगितलं आहे. ११ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने अधिसूचना काढून ब्ल्यू व्हेलचं अॅप आणि ऑनलाइन लिंक काढून टाकण्याचं आदेश दिले होते. त्यामुळे राज्यसरकारनेही पुढाकार घेऊन हा गेम सोशल मीडियावरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या गेमसाठी गृहविभागाने सीआरपीसीचे सेक्शन ३७ आणि १४४ लागू केलं आलं आहे. त्यामुळे जर कोणी ब्ल्यू व्हेल गेम खेळताना दिसत असेल तर लोक तात्काळ पोलीस किंवा जिल्हा प्रशासनाला सुचना करू शकतात, असंही मनोज अग्रवाल यांनी सांगितलं.
राज्यातील सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही या गेमवर बंदी आणण्यासाठी आणि त्याचा प्रसार थांबवण्यासाठी पावलं उचलण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं मनोज अग्रावल म्हणाले आहेत. सेक्शन ३७ नुसार प्रत्येक व्यक्तीने दंडाधिकारी किंवा पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित आहे, असं सांगतानाच ब्ल्यू व्हेल गेमचा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं.
ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडची माहिती उघड; 17 वर्षीय रशियन मुलीला अटकमुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली. या गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे. रशियात राहणाऱ्या या 17 वर्षाच्या मुलीवर अनेक मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. पोलिसांच्या मते, ही मुलगी खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना तिने दिलेला आदेश ऐकला नाही,तर घरातील इतर व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देते. या गेममधील पीडित मुलांना ब्लेडच्या सहाय्याने स्वतःवर वार करायला, भितीदायक सिनेमे बघायला तसंच अर्ध्या रात्रीत उठायचे टास्क दिले जातात. गेम खेळणाऱ्या मुलाला नुकसान पोहचविण्याचा या मागील हेतू असतो.