ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 30- आग्रा, मधुरा भागात झालेल्या हत्येच्या घटना लक्षात घेता तेथे 18 ते 30 वयोगटातील मुलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. आग्रा भागाचे विभागीय आयुक्त के. राममोहन राव यांनी हा निर्णय घेतला आहे. मथुऱा भागात एका सोनाराचं दुकानं लुटून चोरांनी दुकान मालकाची हत्या केली होती, त्याच पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. "रस्त्यावर कडक ऊन्ह असलं तरीही मुलांना कपड्याने चेहरा झाकता येणार नाही तसंच रस्त्यावरून हेल्मेट घालून मुलं चालू शकत नाही", असं के. राममोहन राव यांनी सांगितलं आहे. मुली आणि महिलांना यांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.
सार्वजनिक ठिकाणी चेहारा झाकून फिरणाऱ्या लोकांकडूनच गुन्हे घडतात, असंही विभागीया आयुक्तांचं म्हणणं आहे. "महिला आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी स्कार्फने चेहरा झाकण्यावर आमचा आक्षेप नाही, पण मुलांना चेहरा झाकता येणार नाही. बाहेर कितीही ऊन्ह असलं तरीही या नियमाचं पालन करावं लागेल, तसंच रस्त्यावरून चालताना मुलांना हेल्मेट घालून चालता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मथुरामध्ये आजवर झालेल्या प्रत्येक गुन्ह्यात हल्लेखोर आपला चेहरा झाकून होते. म्हणुन असा निर्णय घेतल्याचं, राममोहन राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला सांगितलं आहे.
हा कोणत्याही प्रकारचा "तुघलकी फर्मान" नाही आहे, प्रत्येक भागातील अशा मुलांवर आमचं लक्ष असणार असल्याची माहिती राव यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे 18 ते 30 वयोगटातील मुलं गुन्ह्यांमध्ये सध्या आढळून येत आहेत. चोरी करणं, चैन खेचणं असे गुन्हे ही मुलं आपला चेहरा झाकून करत आहेत. आग्रा-मधुरातील प्रत्येक भागात अशा मुलांवर अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर सर्वसामान्यांची मतसुद्धा मागविण्यात आली आहेत.
15 मे रोजी मथुरातील कोयलावाली गल्लीतील दोन सोनारांची हत्या करण्यात आली होती. चेहरा झाकलेल्या सहा हल्लेखोरांनी बळजबरीने दुकानात प्रवेश केला आणि या दोन्हीही सोनारांच्या दुकानातील तब्बल 4 कोटींचे दागिने घेऊन करून चोर पसार झाले होते.
या घटनेच्या अवघ्या चार दिवसानंतर फिरोजाबादमध्ये अपहरणाचा प्रकार घडला होता. 19 मे रोजी फिरोजाबादमधले काचेचे व्यवसायिक संजय मित्तल यांचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणाच्या सात तासानंतर फिरोजाबाद पोलिसांनी तुंडला बसई गावातून संजय मित्तल यांची सुटका केली होती.
आग्रा, मधुरा भागात घडणाऱ्या अशा गुन्ह्यांना चाप बसविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे.