पुणे/मुंबई - सध्या देशात सण आणि उत्सवांची चलती दिसत असून गौरी गणपीनंतर आता दसऱ्याची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. नवरात्री उत्सवातही बाजारपेठा फुलल्या आहेत. कोविडच्या दोन वर्षानंतर बाजारात उत्साह दिसून येत असल्याने शेतकरी वर्गही खुश आहे. मात्र, फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असून चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांनी बाजार व्यापल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच, पुण्यातील एका शेतकऱ्याने हरीत लवादाकडे प्लास्टीक फुलांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यावर, प्रदूषण मंडळाला म्हणणे सादर करण्याचे निर्देश हरीत लवादाने दिले आहेत.
चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे. सणासुदीच्या काळात जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया आदींच्या सुट्या व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र, प्लास्टिक फुलांचा वापर विविध समारंभांत वाढला आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात नैसर्गिक फुलांचे दर गडगडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका देशातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळेच, राहुल पवार या शेतकऱ्याने हरीद लवादाकडे धाव घेतली आहे.
राहुल पवार यांनी अॅड. सुधाकर आव्हाड, अॅड चेतन नागरे, अॅड. सिद्धी मिरगे यांच्यामार्फत हरीत लवादात याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत केंद्रीय प्रदूषण महामंडळाला म्हणणे सादर करण्याचे निर्देश हरीद लवादाने दिले आहेत. न्यायमूर्ती दिनेशकुमार सिंग व सदस्य विजय कुलकर्णी यांनी हे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नागरे यांनी माहिती दिली.
शासनाने व पर्यावरण विभागाने १०० मायक्रॉनच्या आतील पॉलिथीन प्लास्टीक वापरास बंदी घातली आहे. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध असलेली प्लास्टीकची फुले ही २९ मायक्रॉनची असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. ही फुले खराब झाल्यानंतर कचऱ्यात टाकण्यात येतात. फुलांच्या रिसायकलची प्रक्रिया अस्तित्वात नाहीत. याशिवाय या फुलांचा रंग पर्यावरणासाठी घातक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
राजू शेट्टींनीही केली मागणी
चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांमुळे देशातील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. लॅाकडाऊननंतर स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उत्पादकांना चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे फटका बसत आहे. फूलशेती तोट्यात आहे. केंद्र सरकारने चिनी प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे गत महिन्यात केली होती.