लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुहेरी कमाल किरकोळ किंमत (ड्यूएल एमआरपी) पद्धतीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर विक्रेत्यांना मॉल्स, एअरपोर्ट आणि हॉटेल्स आदी ठिकाणी जास्त किमतीला वस्तू विकता येणार नाहीत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, दुहेरी एमआरपीवरील बंदी १ जानेवारी २0१८ पासून अमलात येईल. या बंदीनंतर कंपन्यांना पाणी, सॉफ्ट ड्रिंक्स अथवा स्नॅक्स यासाठी कोणत्याही ठिकाणी जास्त किंमत आकारता येणार नाही. महाराष्ट्राच्या वैधमापन विभागाच्या वतीने यासंबंधीची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली होती. वैधमापन विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, ही दीर्घकालीन लढाई आहे. वैधमापनच्या कारवाईविरुद्ध कंपन्या मुंबई उच्च न्यायालयात तसेच अन्य व्यासपीठावर अपिलात गेल्या होत्या. वैधमापन कायद्यात दुहेरी एमआरपीबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी किंमत आकारू शकतो, असा युक्तिवाद कंपन्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आता कायद्यातच बदल करण्यात आला आहे. एकाच उत्पादनासाठी आता दोन वेगवेगळ्या किमती कंपन्यांना ठेवता येणार नाही.गुप्ता म्हणाले की, १ जानेवारीनंतर दुहेरी एमआरपीचा प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. महाराष्ट्राच्या वैधमापन विभागाने फेसबुकवर तक्रार निवारण पेज उघडले आहे. ९८६९६९१६६६ या व्हॉटस् अॅप क्रमांकावर अथवा वैधमापनच्या नियंत्रण कक्षातील 0२२-२२६२ २0२२ या दूरध्वनी क्रमांकावरही तक्रार देता येईल.
दुहेरी एमआरपी पद्धतीवर बंदी
By admin | Published: July 07, 2017 1:46 AM