हैदराबाद : हैदराबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये मंगळवारपासून तणाव असताना, आता त्याचे लोण तेथील उस्मानिया विद्यापीठातही पसरण्याची चिन्हे आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला बुधवारी हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये शिरण्यास मज्जाव करण्यात आला. एवढेच नव्हे, तर कालपासून सुरू झालेले आंदोलन चिघळू नये, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत सुटी देण्यात आली आहे. म्हणजेच सोमवारपर्यंत विद्यापीठ बंद राहणार आहे. दुसरीकडे उस्मानिया विद्यापीठ परिसरातील पाण्याच्या टाकीत आढळून आलेला मृतदेह घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर विद्यार्थ्यांच्या एका गटाने तुफान दगडफेक केली. त्यात सात पोलीस जखमी झाले. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आपले ओळखपत्र दाखवावे आणि नंतर मृतदेह बाहेर न्यावा, असा विद्यार्थ्यांचा आग्रह होता. हा मृतदेह विद्यार्थ्याचा असावा, असा विद्यार्थ्यांचा संशय होता. (वृत्तसंस्था)>तणाव : चार दिवस वर्ग बंद राहणारहैदराबाद सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अप्पा राव पोडिले यांनी सांगितले की, कन्हैया कुमारला विद्यापीठात येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तशी परवानगी मागण्यासाठी आपल्याकडे कोणीही आले नाही. शिवाय कन्हैयाने विद्यापीठात येण्याची गरज नाही. दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येवरून आंदोलन करीत असलेल्या जॉर्इंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिसने बुधवारी सायंकाळी आयोजित केलेल्या एका सभेला कन्हैया मार्गदर्शन करणार होता.कन्हैया कुमार सकाळी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना कन्हैया म्हणाला, ‘केंद्र सरकार रोहित कायदा तयार करेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. कुलगुरू अप्पा राव पोडिले हे कामावर रुजू झाल्यामुळे विद्यापीठात तणाव पसरला आहे. विद्यापीठ प्रशासनाने बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी केली असून चार दिवसांकरिता सर्व वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.अटींचे उल्लंघन झाले की नाही?नवी दिल्ली : देशद्रोहाच्या प्रकरणात जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचे कन्हैया कुमारने उल्लंघन केले किंवा काय, याचा तपास सुरू आहे, असे दिल्ली पोलिसांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. कन्हैयाने जामिनीच्या अटींचे उल्लंघन केले किंवा काय हे सत्य जाणून घेतल्याशिवाय सांगता येणार नाही आणि याबाबत तपास केला जात आहे, असे पोलिसांनी न्या. सुरेश कैट यांना सांगितले. मात्र कन्हैयाने कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसल्याची माहिती दिल्ली सरकारतर्फे न्यायालयात देण्यात आली.
हैदराबाद विद्यापीठात कन्हैयाला प्रवेश बंदी
By admin | Published: March 24, 2016 12:52 AM