नवी दिल्ली : अभिनेता सनी देओल अभिनित ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्लीच्या तीसहजारी न्यायालयाने मंगळवारी देशभर बंदी लादली. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे प्रथमदृष्ट्या दिसत असून, यातील वादग्रस्त संवाद व दृश्ये काढून टाकेपर्यंत ‘मोहल्ला अस्सी’ प्रदर्शित करण्यास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल व साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहेत. हिंदीतील प्रसिद्ध लेखक काशीनाथ सिंग यांच्या पुस्तकावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर लीक झाला आणि हा चित्रपट वादात सापडला. मंगळवारी सत्र न्यायाधीश किशोर कुमार यांच्या न्यायालयाने दखल घेत, या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट वाराणसीतील गंगाकिनारी असलेल्या अस्सी घाटावर बेतलेला असल्याचे दिसते. संपूर्ण ट्रेलर अभद्र दृश्ये व अभद्र शब्दांनी भरलेला आहे. एका दृश्यात भगवान शिवाच्या वेशभूषेतील चित्रपटातील एक पात्र शिव्यांचा वापर करताना दिसत आहे. शिवाच्या वेशभूषेतील पात्राने इतक्या अभद्र भाषेचा वापर करणे निश्चितपणे धार्मिक भावना दुखावणारे आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास मोठ्या प्रमाणात लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण देशभर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी लादण्यात येत आहे.
‘मोहल्ला अस्सी’च्या प्रदर्शनावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2015 2:49 AM