नवी दिल्ली : जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टची चढाई हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. परंतु नुकत्याच आलेल्या प्रलयकारी भूकंपानंतर नेपाळ सरकारने माऊंट एव्हरेस्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय गिर्यारोहकांची निराशा झाली आहे. हे शिखर सर करण्यासाठी पैशांची पुंजी जमविण्यासह प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या गिर्यारोहकांना पुन्हा या मोहिमेवर जाण्याकरिता किमान एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.२५ एप्रिल रोजी विनाशकारी भूकंपाच्या हादऱ्यांनी ८८४८ मीटर उंच माऊंट एव्हरेस्ट शिखरावरून दरडी कोसळल्यामुळे २२ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. जमशेदपूरचे प्रदीपचंद्र शाहू आणि त्यांची पत्नी चेतना यांच्यावर तर दुसऱ्यांदा निराश होण्याची पाळी आली. माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली महिला गिर्यारोहक बनण्याचा मान पटकावणारी बचेंद्री पाल हिने या दाम्पत्याला प्रशिक्षण दिले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दरडी कोसळून काही शेर्पांचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेपत्ता झाल्याने या दाम्पत्याला पहिली चढाई रद्द करावी लागली होती.अरुणाचल प्रदेशच्या अंशू जामसेन्पा हिने सात दिवसांत दोनदा एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा गिनीज विक्रम नोंदविण्यासाठी पूर्ण तयारी केली असताना तिच्या आशेवरही पाणी फेरले आहे. ३५ वर्षीय अंशूने एव्हरेस्ट तीनदा सर करण्याचा जागतिक विक्रम यापूर्वीच नावावर केला आहे. (वृत्तसंस्था)
‘माऊंट एव्हरेस्ट’वर चढाईस यंदा बंदी
By admin | Published: May 04, 2015 11:15 PM