नवी दिल्ली - भोजपुरी गाण्यातील अश्लीलतेवरुन भाजपाखासदार रवि किशन यांनी आवाज उठवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भोजपुरी गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी रवि किशन यांनी केली आहे. तसेच, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही विनंती केली आहे. त्याद्वारे, भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांतील अश्लीलतेवर बंदी घालावी, असे ते म्हणाले.
भोजपुरी चित्रपटातील अश्लीलतेबाबत सातत्याने चर्चा होत असते. यापूर्वीही रवि किशन यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आताही पत्राद्वारे भोजपुरी चित्रपट इंडस्ट्रीची व्यथा किशन यांनी मांडली आहे. केवळ अश्लीलतेमुळे भोजपुरी चित्रपटांकडे मागासलेपणाने पाहिले जाते. साधन-सामुग्री दर्देदार असूनही चित्रपटातील संवाद, दृश्य किंवा गाण्यांवर चर्चा होत नाही. केवळ, चित्रपटातील अश्लीलतेवरुनच चित्रपटाकडे पाहिलं जातं. एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी निर्मात्यांकडून असा कंटेंट निर्माण केला जातो, पण या क्षणीक फायद्याचं दीर्घकालीन नुकसान आहे, असे रविकिशन यांनी म्हटलं आहे.
भोजपुरी सिनेमांत गेल्या काही वर्षांपासून अश्लीलता वाढत आहे. अश्लीलतेचा पर्याय म्हणजे भोजपुरी चित्रपटातील गाणे अशी व्याख्याच बनली आहे. या गाण्यांमुळे तरुण वर्गाचे मन आणि डोकं विकृतीकडे जात आहे. त्यामुळे, लवकरच या गाण्यांवर बंदी आणायला हवी, अशी मागणी प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात रवि किशन यांनी केली आहे.