आज संपूर्ण जग प्रदुषणामुळे त्रस्त आहे. या प्रदुषणातून मुक्त होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. पण, पृथ्वीवरील प्रदुषण एकदम नष्ट होणे सोपी गोष्ट नाही. दरम्यान, या प्रदुषणातून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. सिक्कीम सरकारने राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत दिल्या जाणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सिक्कीम सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले असून, येत्या 1 जानेवारी 2022 पासून सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्कीमच्या अनेक भागात बांबूच्या बाटल्या वापरल्या आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी सिक्कीमचे हे पाऊल कौतुकास्पद आहे.
याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी सांगितले की, राज्यात अनेक नैसर्गिक स्त्रोत आहेत जिथे ताजे आणि चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. सिक्कीम या दिशेने उत्कृष्ट काम करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या बातमीवर बंदी घातल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतांमधून पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता हा निर्णय किती योग्य ठरेल, हे येणारा काळच ठरवेल.