चंदीगड : हरियाणात शालेय शिक्षकांना कामाच्या वेळात जीन्स न घालण्याचे आणि औपचारिक पोशाख परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.हरियाणा(पंचकुला) च्या प्राथमिक शिक्षण विभाग संचालकांनी उपरोक्त आदेश जारी केले आहेत. सर्व जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक जीन्स घालून शाळेत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. एखाद्या कामासाठी संचालकांच्या कार्यालयात येतानाही ते जीन्स परिधान करीत असून ते अयोग्य आहे. तेव्हा यापुढे कुठलाही शिक्षक शाळेत अथवा संचालक कार्यालयात जीन्स न घालता औपचरिक पोशाखात येईल याची खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान हरियाणा विद्यालय शिक्षक संघाने या आदेशाची कठोर शब्दात निर्भर्त्सना केली असून राज्य सरकारद्वारे आपले अपयश लपवून ठेवण्यासाठी उचलण्यात आलेले हे पाऊल असल्याचा आरोप केला आहे. संघाचे अध्यक्ष वजीरसिंह यांनी शनिवारी येथे बोलताना सांगितले की, शिक्षकांसाठी ड्रेसकोडचा हा आदेश सपशेल चुकीचा आहे. शिक्षकांनी काय परिधान करायचे काय नाही याचा निर्णय त्यांच्यावर सोडला पाहिजे. शिक्षकाचे काम शिकवणे आहे. तो जीन्स अथवा धोतरातही शिकवू शकतो. हा आदेश दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला. या आदेशाला विरोध करणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
शालेय शिक्षकांच्या जीन्स घालण्यावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 4:26 AM