ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. ८ - दिल्लीत सत्तेत आल्यानंतर तंबाखूवर बंदी आणणा-या केजरीवाल सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी नोटीस पाठवली. पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारे तंबाखूवर बंदी घालू नये असा आदेश कोर्टाने केजरीवा सरकारला दिला आहे. दिल्लीत सरकार स्थापन झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने तंबाखूवर बंदी आणली. बंदीमध्ये तंबाखू, गुटखा, खैनी आणि जर्दा या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि खरेदी करण्यावर बंदी आणली होती. परंतू केजरीवाल सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी देताना कोर्टाने केजरीवाल सरकारला नोटीस पाठवली असून २० मे रोजी होणा-या पुढील सुनावणीपर्यंत तंबाखूवर बंदी आणू नये असे स्पष्ट आदेश केजरीवाल सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, तंबाखूवर कोणत्याही प्रकारे सरकारची बंदी नसल्याची अधिसूचना सरकार काढणार असून तंबाखू खरेदी व विक्री करण्याला परवानगी असल्याचे सांगण्यात येणार आहे.
दिल्लीत तंबाखूवर बंदी : केजरीवाल सरकारला कोर्टाची नोटीस
By admin | Published: April 08, 2015 4:15 PM