नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहावर मलमपट्टी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते कुमार विश्वास यांच्यावर घरभेदीपणाचे आरोप करणारे आमदार अमानुल्ला खान यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून, विश्वास यांच्यावर राजस्थानचे निवडणूक प्रमुखपद म्हणून नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ओखला येथून निवडून आलेल्या आमदार खान यांनी विश्वास हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला होता. आपचे समन्वयक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत खान यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खान यांच्या टिपणीनंतर विश्वास यांनी मंगळवारी पक्षातील आपल्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगत आपसोबतचे नाते तोडण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, निलंबनाच्या निर्णयावर खान यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बैठकीनंतर शिसोदिया यांनी खान यांचीही भेट घेतल्याचे समजते. विश्वास यांची नाराजी दूर करण्यासाठी खान यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जाते. खान यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी पक्षनेते पंकज गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर खान यांच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिसोदिया यांनी सांगितले. विश्वास यांच्यावरील जबाबदारी वाढविण्यात आली असून, त्यांना राजस्थानचे प्रभारीपद देण्यात आले आहे. राजस्थानात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. नेत्यांमधील गैरसमज आता दूर झाले आहेत, असे सांगून शिसोदिया यांनी कुमार विश्वास यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. केजरीवाल आणि शिसोदिया यांनी काल रात्री विश्वास यांची त्यांच्या गाजियाबाद येथील निवासस्थानी भेट घेऊन मतभेद दूर करण्याचे प्रयत्न केले होते. पीएसी बैठकीत विश्वास सातत्याने पक्षाच्या घटनेचा हवाला देत एक व्यक्ती एक पद धोरण लागू करण्याच्या मागणीवर अडून बसले होते. हे धोरण लागू केल्यानंतर केजरीवाल यांना पक्षाचे समन्वयक किंवा मुख्यमंत्री यापैकी एक पद सोडावे लागणार होते. विश्वास यांना पाठिंबा देणाऱ्या जवळपास डझनभर आमदारांनी दुसरा फॉर्म्युला मांडत उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. दरम्यान, विश्वास यांनी टष्ट्वीट करून पक्षातील वाद मिटवण्याचे संकेत दिले. जर कोणी अंधाराशी लढण्याचा निर्धार केला तर एकटा काजवाही अंधाराला पराभूत करतो. लढू, जिंकू, आभार, भारत माता की जय, असे टष्ट्वीट विश्वास यांनी केले.
आपमधील अंतर्गत कलहावर मलमपट्टी
By admin | Published: May 04, 2017 1:15 AM