जनता दलाचे (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्यानंतर आठवड्याभरात शुक्रवारी मणिपूरमधील पक्षाच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 2014 पासून पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार आणि खासदारांची संख्या 211 वर पोहोचली आहे. मणिपूरमधील एकमेव जनता दलाचे (यू) आमदार जे भाजपमध्ये सामील झाले नाहीत, ते लिलाँगचे आमदार मोहम्मद नसीर आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मणिपूरमधील 60 पैकी 32 जागा जिंकल्या होत्या आणि विधानसभेत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) चाही पाठिंबा आहे. आता जनता दलाचे (यू) पाच आमदारही भाजपमध्ये सामील झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या महिन्यात भाजपसोबतची युती तोडल्याचा परिणाम म्हणून मणिपूरमधील या राजकीय घडामोडीकडे पाहिले जात आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालाच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की, 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून 2022 पर्यंत 211 आमदार आणि खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. दुसरीकडे, या काळात 60 आमदार आणि खासदार भाजपमधून बाहेर पडले आहेत. विरोधी पक्ष भाजपवर आपली 'संसाधने', प्रलोभने आणि सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करत आहेत.
मणिपूरमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींनंतर जनता दलाने (यू) भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने आमदारांना जनता दला(यू) पासून वेगळे करण्यासाठी आपल्या संसाधनांचा वापर केला आहे, असा आरोप जनता दलाने (यू) केला आहे. दरम्यान, जनता दला (यू)सह विरोधी पक्ष आपल्या आमदारांना चांगली वागणूक देत नाही, असा आरोप भाजपने केला आहे.
काँग्रेसला सर्वात मोठा धक्काएडीआरच्या अहवालातील आकडेवारीनुसार, काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. 2014 ते 2021 पर्यंत ही संख्या 177 आहे आणि या वर्षी गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी आणखी 20 यामध्ये सामील झाले आहेत. त्यापैकी 84 जण भाजपमध्ये दाखल झाले आहेत, त्यापैकी 2021 पर्यंत 76 आणि यंदा जवळपास 8 नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.