ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - लोढा समितीच्या शिफारशींवरून बीसीसीआयमध्ये अद्याप धुसफूस सुरूच आहे. आतापर्यंत केवळ विदर्भ आणि त्रिपुरा या राज्य संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार सुधारणांचे तंतोतंत पालन केले. लोढा समितीच्या श्फिारशी लागू करण्यात अडथळा आणल्याबद्दल अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची क्रमश: बीसीसीआय अध्यक्ष तसेच सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली. बोर्डाचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विनोद राय यांच्या नेतृत्वात चार सदस्यांची समितीदेखील नियुक्त केली. प्रशासकांच्या या समितीच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात प्रकरण कसे चालते याची प्रतीक्षा अनेक राज्य संघटना करीत आहेत. बीसीसीआयचे काही वरिष्ठ पदाधिकारी बाहेर झाले तरी त्यांचीच चलती आहे. केवळ विदर्भ आणि त्रिपुरा या दोन राज्य संघटना शंभर टक्के शिफारशी लागू करणाऱ्या पहिल्या पूर्णकालीन सदस्य संघटना ठरल्या आहेत.समितीची पुढील बैठक १७ फेब्रुवारीला होईल. याच बैठकीत लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कुणी कुणी केली नाही, याचा आढावा घेत कोर्टापुढे अहवाल सादर करण्यात येणार आहे. समितीत राय यांच्याश्विाय रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि डायना एडलजी यांचा समावेश आहे.एप्रिल महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत चांगला करार न मिळाल्यास बीसीसीआय जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयसीसीच्या भविष्यातील स्पर्धांमधून माघार घेईल, ही शक्यतादेखील सूत्रांनी फेटाळून लावली. एप्रिलच्या बैठकीत नफ्याची रक्कम वाटप करण्याचा फॉर्म्युला निश्चित होणार आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या आयसीसी बैठकीला उपस्थित राहिलेले लिमये यांनी आयसीसीसोबत पंगा घेणे परवडणारे नाही, असे स्पष्ट केले होते. याशिवाय स्पर्धेतून माघार घेणे हा एकमेव तोडगा नाही. यामुळे असंख्य चाहते नाराज होण्याची भीती लिमये यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बीसीसीआयचा लोढा समितीच्या शिफारशींकडे कानाडोळा सुरूच
By admin | Published: February 09, 2017 6:52 PM