तिरुवनंतपूरम : जन्माने खिश्चन असलेल्या महान गायक येशुदास यांना येथील पद्मनाभ मंदिराचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येशुदास यांनी मंदिरात पूजा अर्चना करण्याची परवानगी मागितली होती.या मंदिराच्या परंपरेनुसार, केवळ हिंदू विचारांना मानणा-या नागरिकांनाच या मंदिरात प्रवेश देण्यात येतो. देशातील दक्षिणेकडील भागात असलेले हे मंदिर एक प्रमुख धार्मिक स्थळ आणि पर्यटन केंद्र आहे. पद्मभूषण सन्मानित येशुदास हे रोमन कॅथोलिक परिवाराशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांना बिगर हिंदू असल्याच्या कारणावरून त्रिसूरमधील गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर आणि मलप्पूरच्या कदमपूजा देवी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता.अर्थात, येशुदास केरळातील सबरीमाला स्थित अय्यप्पा मंदिरात आणि कर्नाटकच्या कोल्लूर येथील मुकाम्बिका मंदिरात पूजा करण्यासाठी नेहमी जातात. हिंदू देव-देवतांची अनेक भजने त्यांनी गायली आहेत.या बैठकीला मंदिराचे प्रधान पुजारी, मुख्य पुजारी, कार्यकारी अधिकारी आणि समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. मंदिराचे कार्यकारी अधिकारी व्ही. रतीसन यांनी सांगितले की, हा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे.येशुदास यांनी या मंदिरात दर्शनासाठी परवानगी मागितली होती. या प्रसिद्ध गायकाची विनंती मान्य करण्यात आली आहे. आता मंदिरात दर्शनासाठी कधी यायचे, याचा निर्णय येशुदास यांनी घ्यायचा आहे. दोन दिवसांपूर्वी येशुदास यांनी एका व्यक्तीकरवी मंदिर प्रशासनाला एक पत्र पाठविले होते आणि हिंदुत्वाप्रती आपली आस्था प्रकट केली होती.
बंदगी में तेरे, सर अब भी झुका रखा है... येशुदास, पद्मनाभ मंदिराचे दरवाजे गायकासाठी उघडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 4:22 AM