नवी दिल्ली : बेंगळुरुमध्ये रविवारी रात्री झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे़ हल्ल्यामागे प्रतिबंधित अतिरेकी संघटना ‘सिमी’चा हात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले असून पोलीस त्याअंगाने तपास करीत आहेत़ राष्ट्रीय तपास संस्था(एनआयए) या कामी कर्नाटक पोलिसांना मदत करीत आहे. स्फोटाची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी १० लाखाचे बक्षीस जाहीर केले. सोमवारी या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर येथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी आणि गुप्तचर विभागाचे संचालक आसिफ इब्राहिम यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली़ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, बेंगळुरुमधील कालचा हल्ला अतिरेकी हल्ला होता, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले़या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, असे विचारले असता ते म्हणाले, योग्य तपासानंतरच ते स्पष्ट होईल़ केंद्र सरकार बेंगळुरू बॉम्बस्फोटाच्या तपासात कर्नाटक सरकारला सर्वोतोपरी मदत करेल़ राज्य सरकारने आयटी शहर अशी ओळख असलेल्या या शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, असेही ते म्हणाले़ या हल्ल्याचा तपास एनआयएला सोवणार का, असे विचारले असता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही बेंगळुरूचा स्फोट अतिरेकी हल्ला असल्याचे सांगितले़ दिल्ली आणि हैदराबादेतून तपासकर्ते आणि तज्ज्ञांची दोन पथके बेंगळुरूकडे पाठविण्यात येत आहेत़ ते तपासात स्थानिक पोलिसांना मदत करतील़कर्नाटकची उपाययोजना बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने सार्वजनिक सुरक्षा कायदा आणणे, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह विविध सतर्कता उपाययोजना जाहीर केल्या़ सिमीचा हात?या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कुणीही स्वीकारलेली नाही़ पोलीस सर्व अंगाने तपास करीत आहेत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले़ या हल्ल्यामागे सिमीचा हात आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, मध्य प्रदेशच्या तुरुंगातून सिमीचे काही अतिरेकी पळाले आहेत़ ते कर्नाटकात आल्याची माहिती आमच्याकडे होती़ या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत़ इसिस या अतिरेकी संघटनेचा भारतातील टिष्ट्वटर हाताळणारा मेहदी याच्या अटकेचा संबंध असण्याचीही शक्यताही पोलीस तपासत आहेत़
बंगळुरू स्फोट हा अतिरेकी हल्ला
By admin | Published: December 30, 2014 1:05 AM