गुवाहाटी : घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशलगतची आसामची सीमा आगामी दोन वर्षांत सील केली जाईल, असे भावी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. भाजपाने निवडणुकीत घुसखोरीचा प्रश्न प्रचाराचा मुद्दा बनविला होता.घुसखोरी आणि ती रोखण्याचे प्रयत्न हे आपल्या सरकारसमोरील सर्वांत महत्त्वाचे प्रश्न असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सीमेवर कायमस्वरूपी कुंपण घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २ वर्षांची मुदत दिली आहे. त्या मुदतीच्या आतच कुंपण घालण्याचे काम आम्ही पूर्ण करू . यंदा जानेवारीतच राजनाथसिंह यांनी आसामच्या करीमगंज जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेचा दौरा केला होता. त्यात त्यांनी त्या भागात काटेरी कुंपण घालण्याचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. कुंपण घालताच घुसखोरी आपोआपच थांबेल, असे राजनाथ यांनी त्यावेळी सांगितले होते. बांगलादेशातून घुसखोरी रोखण्यासाठी कोणती प्रणाली अमलात आणणार की कायदा करणार, असे विचारले असता सोनोवाल म्हणाले की, आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमध्ये (एनआरसी) सुधारणा चालू आहे. त्याचे अंतिम प्रारूप जाहीर झाल्यानंतर कोण नागरिक आहे आणि कोण घुसखोर आहे हे समजू शकेल. त्यावेळी सध्याच्या कायद्यानुसार घुसखोरांवर कारवाई केली जाईल.
बांगला सीमा २ वर्षांत सील करणार - सोनोवाल
By admin | Published: May 22, 2016 3:00 AM