ढाका - बांगलादेशातील युनूस सरकारच्या नव्या निर्णयानं भारताचं टेन्शन वाढलं आहे. बांगलादेशातपाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधावर काही सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांची सुरक्षा मंजुरी संपल्याने बांगलादेशच्या जमिनीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चे एजेंट सहजपणे पोहचू शकतात. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हे संबंध थेट भारतीय सुरक्षेवर दिसून येतील अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अजय रैना सांगतात की, बांगलादेशातील सत्ता परिवर्तन पाकिस्तानच्या ISI च्या माध्यमातून केल्याचं समोर आले आहे. मागील पंतप्रधानांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मुक्तपणे फिरता येऊ शकते त्याशिवाय सत्ताधारी प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप होताना दिसत आहे. जर सर्वकाही बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि पाकिस्तानच्या योजनेनुसार झाले तर लवकरच बांगलादेश व्यावहारिकरित्या पूर्वीसारखा पाकिस्तान बनेल असं त्यांनी सांगितले.
बांगलादेशात सध्या कट्टरपंथी सक्रीय होत आहेत. बांगलादेशातील अंबरखाना इथं पाकिस्तान समर्थित आघाडी एकजूट झाल्याची बातमी आहे. याठिकाणाहून कथितपणे भारताच्या पूर्वोत्तर राज्यात घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. भारतात आसाम मेघालय सीमेवर वाढत्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. नव्या सत्तेत बांगलादेश प्रशासनात वैचारिक बदल सेक्युलर आणि लोकशाही मुल्यांना धोका देणारे ठरलेत.
भारतासाठी धोक्याची घंटा का?
पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाच्या निर्बंधातून काही दिलासा देणे भारतासाठी दुहेरी धोका आहे. त्यामुळे ना केवळ इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील गुप्तचर यंत्रणा एकमेकांना फायदा होणार तर त्यामागचा मुख्य उद्देश भारताला अस्थिर करण्याचा आहे. पूर्वोत्तर राज्यात विशेषत: आसाममध्ये अशांतता निर्माण करून घुसखोरी आणि कट्टरपंथी कारवायांसाठी हॉटस्पॉट बनवलं जाऊ शकते. बांगलादेशात होणाऱ्या बदलांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नजर ठेवून आहेत. सीमेवर जवानही अलर्टवर आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारतासाठी एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात.