होळीच्या (Holi) एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची (Bangladesh Capital) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २०० लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच, याठिकाणी लूटही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या घटनेचा इस्कॉन इंडियाकडून निषेध करण्यात आला आहे. इस्कॉन इंडियाचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या घटनेचा निषेध करत ते दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे.
"डोल यात्रा आणि होळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेली ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी १५ मार्च हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला. हजारो असहाय्य बांगलादेशी आणि पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या दु:खाबद्दल तेच संयुक्त राष्ट्र मूक भूमिका घेत आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटतं," असं राधारमण दास म्हणाले.