Bagladesh Crisis News : बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरू झालेले आंदोलन हळुहळू हिंसाचारात बदलले. या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना आपले पंतप्रधानपद सोडून देशातून पलायन करावे लागले. दरम्यान, या हिंसाचाराच्या आगीत देशातील अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट केले जात आहे. आतापर्यंत अनेक मंदिरे तोडण्यात आली असून, हिंदूंच्या घरांवरही हल्ले होत आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. 3
गिरीराज सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून विरोधकांवर टीका केली. ते म्हणतात, "India आघाडीचे लोक पॅलेस्टाईनवरुन रडत होते आणि आता बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूंच्या नरसंहारावर गप्प आहेत. त्यांची धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या वेदनांवर मरते," अशी बोचरी टीका त्यांनी केली. दरम्यान, या घटनेवरुन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेत निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, भारत या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
हिंदूंवरील हल्ले वाढलेसुरुवातीला बांग्लादेशातील अल्पसंख्याकांवर, मुख्यत: हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या तुरळक बातम्या आल्या, पण लवकरच त्यात वाढ होऊ लागली. ढाक्यातील वृत्तवाहिन्यांवरही हिंसाचाराच्या बातम्या आल्या; अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले. बांग्लादेशातील खुलना विभागातील मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिराची सोमवारी आंदोलकांनी तोडफोड आणि आग लावली. हिंदूंच्या घरांना लक्ष्य करण्यात आले आणि अगदी महिला आणि तरुण मुलींना पळवून नेण्यात आले.
अमित शाहंनी बोलावली बैठक बांग्लादेशातील सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि गृह सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांग्लादेशातील परिस्थिती आणि सीमा सुरक्षा यावर चर्चा झाली. दरम्यान, भारत बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.
भारत-बांग्लादेश सीमा सीलबांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क आहे. बीएसएफने सोमवारीच 4,096 किमी लांबीच्या भारत-बांग्लादेश सीमेवरील सर्व युनिट्ससाठी हाय अलर्ट जारी केला असून, संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांग्लादेशची सर्वाधिक 2200 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालशी लागून आहे आणि हाच भाग अत्यंत संवेदनशील आहे. ताज्या घडामोडी लक्षात घेऊन बीएसएफचे कार्यवाहक महासंचालक (डीजी) दलजित सिंग चौधरी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भारत-बांग्लादेश सीमेचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
बांग्लादेशातील हिंदू लोकसंख्या घटलीशेख हसीना यांच्या काळात बांग्लादेशातील अल्पसंख्याकांना टार्गेट केले गेले नाही, असे नाही, पण ते रोखण्यात त्यांना यश आले. आता त्यांनाच देश सोडावा लागल्यामुळे या घटना उघडपणे घडू लागल्या आहेत. आज बांग्लादेशात हिंदूंची लोकसंख्या 8 टक्के आहे, जी 1947 च्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यावेळी हिंदू लोकसंख्या 30 टक्के होती.