CJI DY Chandrachud: बांगलादेशात शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान पद सोडून देशातून पळ काढला. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी देशाची सुत्रे हातात घेतली आहे. बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलनात शेकडो लोकांचा बळी गेला. हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूना लक्ष करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केले आहे. भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बांगलादेशबाबत महत्त्वाचे विधान केले.
बांगलादेशात सत्ताबदल झाल्यानंतर अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बांगलादेशात हिंसाचाराच्या घटनांमुळे चिंतेचे वातावरण असताना भारताने आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयातही ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बांगलादेशातील नुकत्याच घडलेल्या घटनांबाबत भाष्य केलं. अनेक वकिलांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात देशासाठी सर्वस्व अर्पण केले. व्यावसायिक वकिलांनी कायदेशीर पेशा सोडून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचा घेतलेला निर्णय हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असं सरन्यायाधिश चंद्रचूड म्हणाले.
“आपण १९५० मध्ये संविधान स्वीकारले. मात्र शेजारच्या राष्ट्रात स्वातंत्र्य अनिश्चित होते. त्याचा परिणाम काय झाला? हे आपण बांगलादेशमध्ये पाहू शकतो. याच्यातून स्वातंत्र्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. स्वातंत्र्याला गृहीत धरणे खूप सोपे असते. पण या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत, हे भूतकाळातील प्रसंगावरून ओळखले पाहीजे,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.
"आज सकाळी मी कर्नाटकातील एका गायिकेचा 'साउंड्स ऑफ फ्रीडम' नावाचा लेख वाचत होतो. आज अनेक तरुण वकील स्वातंत्र्यानंतरच्या पिढीतील आहेत. पण तुमच्यापैकी बरेच जण आणीबाणीनंतरच्या पिढीतील आहेत. वकील आपल्या देशात एक शक्ती आहेत. न्यायालये अधिकार आणि स्वातंत्र्य जिवंत ठेवण्यासाठी काम करतात. न्यायालयाचे सदस्य हे न्यायाधीश यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. ते आम्हाला लोकांच्या वेदना पाहण्याची संधी देतात," असेही सरन्यायाधीश म्हणाले.
दरम्यान, बांगलादेशातील परिस्थितीवर सरन्यायाधीशांचे भाष्य देखील महत्त्वाचे आहे कारण बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. भारतानेही यावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले आहे. नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या या सरकारमध्ये १७ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.