Brij Bhushan Sharan Singh : मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन होऊन सुद्धा बांगलादेशातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. बांगलादेशातील परिस्थिती अद्याप नियंत्रणाबाहेर आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे समर्थक बंड करू शकतात, असं म्हटलं जात आहे. तसंच, जमावाकडून देशात अनेक हिंदू समुदायावर हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांना, विशेषत: हिंदूंना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे, याबाबत भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी चिंता व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं की, बांगलादेशमध्ये अत्यंत दुःखद परिस्थिती आहे. हे सर्व भारताच्या शेजारी घडत आहे. बांगलादेशात जे काही घडले आणि घडत आहे, त्याचा आपण कितीही निषेध केला तरी, त्यासाठी शब्द कमी आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हे खेदजनक आहे. तसंच, देशातील मोठे नेते यावर बोलत नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एकही ट्विट केलेलं नाही. ही देशाची जबाबदारी जेवढी मोदी आणि भाजपची आहे, तेवढीच विरोधकांचीही आहे, असं ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले.
याचबरोबर, कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा संदर्भ देत ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, बंगालमध्ये डॉक्टर सुरक्षित नाहीत. पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. तसंच, बांगलादेशच्या बाजूला कोलकाता आहे. त्यामुळं देश सुरक्षित राहिला तर राहुल गांधीही सुरक्षित राहतील, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात जनतेनं उठाव केला होता. यानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला.
शेख हसीना सध्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. या घटनेनंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. तरीही बांगलादेशातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. बांगलादेशात शेकडो हिंदूंची घरे जाळण्यात आली. अनेक मंदिरांवर हल्ले झाले आहेत, त्यानंतर हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून सुरक्षेची मागणी करत आहे. तसंच अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापन करावं, अल्पसंख्याकांसाठी १० टक्के संसदीय जागा, अल्पसंख्याक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या हिंदू समाजाकडून करण्यात येत आहेत.