नवी दिल्ली - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावं लागलं आहे. सोमवारी दक्षिण आशियातील देश बांगलादेशातील परिस्थितीमुळे चर्चेचं केंद्रबिंदू बनले. बांगलादेशात अराजकता माजली आहे. रविवारी झालेल्या आंदोलनात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. सोमवारी आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या घराकडे निघाले तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती. त्यामुळे हसीना यांनी पदाचा राजीनामा देत तातडीने देश सोडला.
जेव्हा हिंसक आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या घराकडे कूच करत होते तेव्हा सर्व सुरक्षा अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. शेख हसीना यांच्याकडे तिथून सुरक्षित बाहेर निघण्यासाठी केवळ ४५ मिनिटे शिल्लक होती. त्यावेळी शेख हसीना यांच्याकडे २ पर्याय होते. एकतर आपल्याच देशातील लोकांविरोधात ताकदीचा प्रयोग करत त्यांना रोखणे आणि दुसरं पंतप्रधान निवासस्थान सोडत सुरक्षित ठिकाणी जाणं. त्यानंतर हसीना यांनी १५ वर्षाचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपवून देश सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयापूर्वी अनेक फोन कॉल आणि बैठकांचा सिलसिला सुरू होता.
देश सोडण्यापूर्वी अखेरचे क्षण होते थरारक
बांगलादेशी वृत्तपत्र प्रोथोम अलोच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशात आपल्या अखेरच्या कालावधीत हसीना यांनी पदावर कायम राहण्याचा भरपूर प्रयत्न केला. देश सोडण्यापूर्वी त्यांनी अनेक बड्या अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. हसीना सोमवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून जवळपास १ तास कायदा सुव्यवस्थेचा आपल्या गरजेनुसार वापर करत होत्या. तोपर्यंत आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या गणभवन निवासस्थानाच्या दिशेने जमा होत होते. बांगलादेशाच्या इतिहासात अशाप्रकारचा जनसागर कुणीही पाहिला नव्हता. रविवारी आंदोलनात झालेल्या मृत्यूमुळे जमावाने गणभवनात घुसण्याचा इशारा दिला. त्यामुळे पुढे काय होणार याची कल्पना हसीना यांना आली होती.
...पोलिसांच्या हातून परिस्थिती निसटली
शेख हसीना मागील ३ आठवड्यापासून सशस्त्र दल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत होत्या. परिस्थिती पाहता अवामी लीगच्या काही नेत्यांनी सैन्याकडे सत्ता हस्तांतरीत करावी यासाठी हसीना यांच्याकडे आग्रह धरला. त्यावेळी हसीना कुठलाही सल्ला ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या. त्याऐवजी सोमवारी कर्फ्यू आणखी कडक करा असा आदेश त्यांनी सुरक्षा दलांना दिला. हसीना यांनी इंटरनेट सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई करणं बंद केले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजेपर्यंत वायू सेना, नौदल आणि लष्कराला पंतप्रधान निवासस्थानी बोलावलं. पोलीस महासंचालकांनीही पाचारण केले. परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बहीण, मुलाने देश सोडण्याचा हट्ट धरला
जेव्हा अधिकारी शेख हसीना यांना देश सोडण्याचा सल्ला देत होते, मात्र हसीना काहीही ऐकत नव्हत्या. त्यावेळी पंतप्रधानांची बहीण शेख रेहाना यांनी हसीना यांना वेगळ्या खोलीत घेऊन संवाद साधला. त्याचवेळी हसीना यांचा मुलगा सजीब वाजिद जॉय याला एका अधिकाऱ्याने संपर्क साधला. मुलगा परदेशात राहतो. बहीण आणि मुलाने हट्ट केल्यानंतर हसीना राजीनामा देऊन देश सोडण्यास तयार झाल्या. बांगलादेश सोडण्यापूर्वी हसीना यांना देशाला संबोधित करायचे होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना देश सोडण्यासाठी तुमच्याकडे केवळ ४५ मिनिटे शिल्लक आहेत त्यामुळे तुम्ही संदेश रेकॉर्ड करू शकत नाही असं सांगितले.
तेजगाव एअरबेसवरून हेलिकॉप्टरमधून हसीना राष्ट्रपती भवनात पोहचल्या, तिथे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर हसीना त्याच विमानाने भारतात आल्या. अगरतला इथल्या बीएसएफच्या हेलिपॅडवर त्यांनी लँडिंग केले. तिथून संध्याकाळी ५.३६ मिनिटांनी गाजियाबादमधील भारतीय वायू सेनेचं हिंडन एअरबेसवर त्या पोहचल्या. त्याठिकाणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. सध्या हसीना दिल्लीत आहेत. बांगलादेशात सैन्यानं सत्ता हाती घेतली आहे. लवकरच तिथे अंतरिम सरकार बनवलं जाण्याची शक्यता आहे.