देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्या या बांगलादेशींना माघारी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष अभियानही चालवले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शेजारील बांगलादेशमधून येणाऱ्या विस्थापितांना आश्रय देण्याबाबत मिझोरामची भूमिका समजून घेण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मिझोरामच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, २०२२ पासून बांगलादेशमधून सुमारे २ हजार जो जमतीच्या लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोहत झालेल्या एका बैठकीमध्ये मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मदींना सांगितले की, मिझोराम सरकार बांगलादेशमधील जो जमातीच्या लोकांना माघारी धाडू शकत नाही. तसेच त्यांना निर्वासित करू शकत नाही.
लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, मिझो जमातीमधील एक असलेल्या बावम जमातीचे अनेक लोक बांगलादेशमधून २०२२ पासून मिझोराममध्ये आश्रय घेत आहेत. त्यातील अनेकजण अजूनही राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये बांगलादेशी लष्कराने कुकी-चिन नॅशनल आर्मीविरोधात कारवाई केल्यानंतर बावम जमातीचे लोक मिझोराममध्ये प्रवेश करू लागले होते.