पश्चिम बंगाल सीमेवरून अवैधरित्या भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनी, बुधवारी सकाळी बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हे घुसखोर तस्करीसाठी भारताच्या सीमेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यात घटनेत एक जवान जखमी झाला आहे. घुसखोर मोठ्या संख्येने काठ्या घेऊन आले होते. तसेच त्यांच्याकडे वायर कटरही होते. जेव्हा बीएसएफच्या जवानांनी त्यांना आव्हान दिले, तेव्हा त्यांनी थांबण्याऐवजी धारदार शस्त्रांने त्यांच्यावर हल्ला केला.
ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. बांगलादेशींच्या या गटाने दक्षिण दिनाजपूरजवळ मलिकपूर गावात तस्करी अथवा दरोडा टाकण्यासाटी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी बीएसएफ जवानांनी त्यांना भारतीय सीमेत प्रवेश करताना बघितले आणि थांबण्यास सांगितले, मात्र, थांबण्याऐवजी या घुसखोरांनी बीएसएफ जवानांवरच हल्ला केला.
जवानांनी गोळीबार केला, पण...-या घुसखोरांना रोखण्यासाठी बीएसएफच्या जवानांनी प्राणघातक नसलेल्या दारूगोळ्याने गोळीबार केला. मात्र, बांगलादेशी घुसखोर थांबले नाही आणि त्यांनी बीएसएफ पथकाला घेराव घातला. यावेळी घुसखोरांनी बीएसएफ कर्मचाऱ्याचे डब्ल्यूपीएन हिसकावण्याचाही प्रयत्नही केला. यावेळी झालेल्या झटापटीत बीएसएफचा एक जवन जखमी झाला. यानंतर स्वसंरक्षणासाठी बीएसएफच्या जवानाने बांगलादेशी घुसखोरांवर गोळीबार केला. यानंतर घुसखोर पळून गेले.
एक घुसखोरही जखमी -गोळीबारानंतर परिसरात दाट धूर पसरला होता. यानंतर, परिसरात शोध मोहीम केली असता, एक बांगलादेशी गुन्हेगार जखमी अवस्थेत आढळला. त्याला बीएसएफने गंगारामपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना स्थळावरून काठ्या आणि वायर कटर जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय एका जखमी सैनिकालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांकडून भारतात प्रवेश करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही. यापूर्वीही अनेक वेळा असे प्रयत्न झाले आहेत. तसेच अनेक वेळा, त्यांना पकडून पुन्हा बांगलादेशकडे सोपवण्यातही आले आहे.