लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर १००हून अधिक बांगलादेशी ग्रामस्थांनी हल्ला केला. त्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. भारतीय शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी बीएसएफचे जवान आपल्या कर्तव्यावर होते. तेव्हाच त्यांच्यावर सीमेपलीकडून हल्लेखोरांनी हल्ला केला आणि त्यांची शस्त्रेही लुटली.
बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली. भारतीय शेतकऱ्यांनी तक्रार केली होती की, बांगलादेशी शेतकरी त्यांची गुरे चरण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांच्या शेतात घुसवतात आणि त्यांच्या पिकांचे जाणूनबुजून नुकसान करतात. भारतीय शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बीएसएफच्या जवानांनी सीमेजवळ तात्पुरती चौकी उभारली होती.
काठ्या, धारदार शस्त्रांनी हल्लाजवानांनी बांगलादेशी शेतकऱ्यांना रोखल्यानंतर गावकरी आणि बदमाशांनी भारतीय हद्दीत घुसून जवानांवर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांची शस्त्रे हिसकावून हल्लेखोर पळून गेले. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी तत्काळ बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी) अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देत ध्वज बैठक आयोजित करण्यास सांगितले.