मुंबई - देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीने प्रकरणातून हात काढत बँकेला जबाबदार धरत उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने प्रकरण सार्वजनिक करत आपले कर्ज परत करण्याची क्षमता असणारे सर्व मार्ग बंद केल्याची बोंब नीरव मोदी मारत आहे. दरम्यान यावेळी बँकेने दाखवलेली आकडेवारी आपण घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त आहे असा दावाही त्याने केला आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापनाला 15/16 फेब्रुवारीदरम्यान एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र पीटीआयच्या हाती लागलं आहे. या पत्रात नीरव मोदीने आपली कर्जाची रक्कम पाच हजार कोटींपेक्षा कमी असल्याचा दावाही केला आहे.
'कर्जाचा आकडा फुगवून सांगण्यात आल्या कारणाने प्रसारमाध्यमांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि यामुळे लगेत शोधमोहिम आणि जप्तीची कारवाई सुरु झाली. प्रकरण सार्वजनिक करण्यात आल्या कारणाने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला', असं नीरव मोदीने पत्रात लिहिलं आहे. 'यामुळे आमची कर्जफेडीची क्षमता कमी झाली आहे', असा दावाही त्याने पत्रातून केला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नीरव मोदी आपल्या कुटुंबासोबत देश सोडून पळून गेला आहे.
'कर्जवसुली करण्याच्या घाईत तुम्ही मी दिलेल्या ऑफरकडे दुर्लक्ष करत प्रकरण सार्वजनिक केलं. यामुळे आमचा ब्रॅण्ड आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून कर्जफेडीचे सर्व मार्ग बंद केले आहेत', असं नीरव मोदीन पत्रात लिहिलं आहे.
मोदी व चोकसींनी २४ कंपन्या, १८ व्यावसायिकांनाही बुडवलेनीरव मोदी व मेहूल चोकसी जोडगोळीने सरकारी बँकाच नव्हे, तर २४ कंपन्या व १८ व्यावसायिकांनाही दिवाळखोर केले आहे. २0१३ ते २0१७ या काळात या कंपन्या व व्यक्तींनी मोदी-चोकसी यांच्या कंपन्यांची फ्रँचाइजी घेतली होती. दिल्ली, आग्रा, मेरठ, बंगळुरू, म्हैसूर, कर्नाल तसेच गुजरात व राजस्थानातील अनेक ठिकाणांसाठी या फ्रँचाइजी घेण्यात आल्या होत्या. फ्रँचाइजीसाठी मोदी-चोकसीच्या कंपन्यांनी ३ ते २0 कोटी डिपॉझिट घेतले होते. तथापि, नंतर त्यांना हिरे आणि रत्ने दिलीच नाहीत. या कंपन्या-व्यावसायिकांनी दोघांविरोधात फौजदारी तक्रारी दाखल केल्या आहेत.
पीएनबीने गमावले १0,७८१ कोटींचे बाजार भांडवलपंजाब नॅशनल बँकेने गेल्या बुधवारी नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती जाहीर केली. तेव्हापासून बँकेचे समभाग घसरणीला लागले आहेत. मुंबई शेअर बाजारात गेल्या चार सत्रांत बँकेचे समभाग २८ टक्क्यांनी घसरले आहेत. १0,७८१.१२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल बँकेने गमावले आहे.