मुंबई: नोटाबंदीनंतर बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली. मात्र आता उलट स्थिती पाहायला मिळतेय. खातेदार बँकांमध्ये रोकड जमा करण्यास फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळे बँकांमध्ये जमा होणाऱ्या रोकड वाढीचं प्रमाण 6.7 टक्क्यांवर घसरलंय. विशेष म्हणजे हे 1963 नंतरचं सर्वात कमी प्रमाण आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात बँकांचा विकास दर 6.7 टक्के होता. बँकांमध्ये रोकड जमा करण्याकडे लोकांचा कल कमी झाल्याचं यातून दिसून येतंय. नोटाबंदीनंतर बँकेत रोकड जमा करण्यास ग्राहक फारसे उत्सुक नाहीत. त्याऐवजी लोक म्युचुअल फंड आणि इतर पर्यायांकडे वळले आहेत. बँकांपेक्षा म्युचुअल फंडमध्ये चांगला परतावा मिळत असल्यानं गुंतवणूकदार म्युचुअल फंड्सकडे वळताना दिसताहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यानंतर 86 टक्के रोकड लोकांनी बँकांमध्ये जमा केली. मात्र आता नेमकी उलट परिस्थिती पाहायला मिळतेय. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग व्यवस्थेत आलेला पैसा बँकिंग व्यवस्थेतून बाहेर पडलाय. काही दिवसांपूर्वी देशाच्या अनेक राज्यांमध्ये रोकड पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी या राज्यांमध्ये अतिरिक्त रोकड पुरवठा करण्यात आला. त्यामुळे लोक बँकांमध्ये पैसे ठेवण्यास फारसे उत्सुक नसल्याचं दिसून आलं. 2017 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बँकांमध्ये 108 कोटी रुपयांची जमा झाली होती. 2018 मध्ये हे प्रमाण 117 कोटी रुपयांवर गेलं. ही वाढ 6.7 टक्के इतकी आहे. गेल्या 55 वर्षांमधील ही सर्वात कमी वाढ आहे.
बँकेत जमा होणाऱ्या रकमेनं गाठला 55 वर्षांतील नीचांक, नोटाबंदीचा परिणाम असल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2018 5:59 PM