इंदोर - भारतीय बँक खातेधारकांची माहिती विकण्याच्या आरोपाखाली दोन हस्तकांना अटक करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेश सायबर सेल पोलिसांनी दिली आहे. फक्त 500 रुपयांत ही खासगी माहिती विकली जात होती. इंदोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, या हस्तकांना पाकिस्तानातील लाहोरमधून आदेश दिले जात होते. मुंबईत ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
इंदोर युनिटच्या सायबर सेलचे पोलीस अधिकक्ष जितेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या तक्रारीनंतर या टोळीतील दोन भारतीय हस्तकांना अटक करण्यात आली आहे. रामकुमार पिल्लई आणि रामप्रसाद नाडर अशी त्यांची नावं आहेत'. मुंबईत राहणारे हे दोन्ही आरोपी पाकिस्तानी नागरिक शेख अफजलकडून चालवण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीत सहभागी होते.
पोलीस अधिक्षक जितेंद्र सिंह यांनी सांगितल्यानुसार, 'एका बँक अधिका-याने 28 ऑगस्ट रोजी क्रेडिट कार्डमधून अचानक 72 हजार 401 रुपये गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर कोणताही विलंब न करता पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवलं होतं, ज्यानंतर हा खुलासा झाला'. या टोळीचे सदस्य डार्क वेबच्या (इंटरनेटचं गुप्त जग जिथे बेकादेशीर गोष्टी केल्या जातात) माध्यमातून इतर वेबसाइट्सवरुन कोणत्याही खातेधारकाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती खरेदी करत असत.
या क्रेडिट कार्डमधून गुप्त माहिती मिळवल्यानंतर, टोळीचे सदस्य विमान तिकीट तसंच बँकॉक, थायलंड, दुबई, हाँगकाँग आणि मलेशियासारख्या ठिकाणचे हॉलिडे पॅकेज घेत असत. यासोबत परदेशी कंपन्यांकडून महागडं सामानाची खरेदीही करत असत. डार्क वेबवरुन क्रेडिट कार्डची माहिती खरेदी करण्यासाठी टोळीचे सदस्य बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे भरत असत. प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी 500 ते 800 रुपये खर्च केले जात असत. ज्या आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सवर ओटीपीची गरज लागत नसे, तिथेच कार्डचा वापर केला जाई.
क्रेडिट कार्डचा वापर केल्यानंतर जितका फायदा होईल, त्यातील अर्धा भाग लाहोरमध्ये बसलेल्या शेख अफजलला पाठवण्यात येत असत. शेखच्या माध्यमातूनच डार्क वेबवरुन क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती पुरवली जात असे.