बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही या महिन्याच्या अखेरीस बँकिंग संबंधी कुठल्या कामासाठी बँकेमध्ये जाणार असाल तर ते लवकर उरकून घ्या. २८ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान, बँकिंगसंबंधित कामकाज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बँक युनियनने दोन दिवसांचा संप पुकारल्याने त्याचा बँकांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हा संप दोन दिवसांचा असला तरी बँकिंग सेवा चार दिवस विस्कळीत होणार आहे. त्याचं कारण म्हणजे २८ जानेवारी हा महिन्यातील चौथा शनिवार आहे. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत. तर २९ जानेवारी रोजी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर ३० आणि ३१ जानेवारी रोजी बँक युनियनने संप पुकारल्याने ग्राहकांना चार दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मुंबईमध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची बैठक झाली. त्यामध्ये बँक युनियननी दोन दिवसांचा संप करण्याचा निर्णय घेतला. बँक युनियन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवू लागल्या आहेत.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सी. एच. वेंकटचलम यांनी माहिती देताना सांगितले की, युनायटेड फोरमची बैठक झाली आहे. त्यामध्ये दोन दिवसांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, बँकांचे कामकाज पाच दिवसांचे करण्यात यावे, तसेच पेन्शन अपडेट करण्यात यावी, अशी बँक युनियनची मागणी आहे.
त्याबरोबरच एनपीएस संपुष्टात आणावी आणि वेतनामध्ये वाढ करण्यासाठी चर्चा करण्यात यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या सर्वांशिवाय सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी युनियनने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्टी असेल. तर त्यानंतर सोमवार आणि मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे. त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एटीएममधील रोख रक्कम संपण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच चेक क्लिअरन्समध्येही अडचणी निर्माण होऊ शकतात.