नवी दिल्ली : सरकारी बँकांना आठवड्यात लवकरच केवळ ५ दिवस काम करण्याची मुभा मिळणार आहे. या प्रस्तावास केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून लवकरच मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉईज (यूएफबीई) यांनी सप्ताहात ५ दिवस कामास आधीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. यात दररोजच्या कामात मात्र ४० मिनिटांची वाढ करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव ‘आयबीए’ने सरकारला पाठविला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळून वेतन बोर्डाच्या सुधारणेसह अधिसूचना काढली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या व्यवस्थेत बँका प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी उघड्या असतात. नव्या व्यवस्थेत त्या शनिवार-रविवार बंद राहतील.
मेमध्ये अनेक भागांत बँका ११ दिवस बंद राहणारदरम्यान, मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा आणि महाराणा प्रताप जयंतीसह अनेक सुट्या आल्यामुळे देशातील अनेक भागांत बँका ११ दिवस बंद राहतील. मोबाइल, इंटरनेट बँकिंग, तसेच एटीएम सेवा मात्र सुट्यांतही सुरू राहतील.