नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या सहामाहीत बँक घोटाळ्यांत वार्षिक आधारावर ८ पट वाढ झाली आहे. या कालावधीत १८,४६१ प्रकरणांत २१,३६७ कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ‘भारतातील बँकिंग कल आणि विकास २०२३-२४’ या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ आणि वित्त वर्ष २०२४-२५ चा आतापर्यंतचा कालावधी यातील बँकांच्या कामगिरीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. यंदा एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील विविध बँकांत १८,४६१ घोटाळे झाले. त्यात २१,३६७ कोटी रुपयांची फसवणूक झाली. आदल्या वर्षी १४,४८० बँक घोटाळ्यांत २,६२३ कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.
अहवालात म्हटले आहे की, या घोटाळ्यांमुळे देशातील वित्तीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. यात प्रतिष्ठात्मक जोखीम, परिचालनात्मक जोखीम आणि व्यावसायिक जोखीम यांचा समावेश आहे. याशिवाय वित्तीय स्थैर्याबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास कमी झाला आहे.