जम्मू-काश्मीरमध्ये 'टार्गेट किलिंग'ची दहशत पुन्हा वाढली आहे. काही दिवसांपूर्वी शिक्षिकेची हत्या केल्यानंतर आज कुलगामध्ये बँकेत घुसून दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची हत्या केली आहे. मूळचे राजस्थानमधील असलेले बँक मॅनेजर विजय कुमार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे वय अवघे 21 वर्षे होते.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 8 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी असलेले विजय कुमार हे एलाकी देहाती बँकेत मॅनेजर होते. पोलिसांनी सांगितले की, "कुलगाम जिल्ह्यातील आरे मोहनपोरा येथील एलाकी देहाती बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली."
खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी विजय कुमारची हत्या केली. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.
मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
या वर्षी दहशतवाद्यांनी किती नागरिकांची हत्या केली?या वर्षात आतापर्यंत 19 जणांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. मार्च आणि मे महिन्यात दहशतवाद्यांच्या हाती सर्वाधिक निष्पाप लोक मारले गेले आहेत. फेब्रुवारीमध्ये दहशतवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली होती. मार्चमध्ये दहशतवाद्यांनी 8 जणांचा बळी घेतला होता. एप्रिलमध्ये 2, मे महिन्यात 7 आणि जूनमध्ये आतापर्यंत 1 जण टार्गेट किलिंगचा बळी ठरला आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी चकमकीत आतापर्यंत 94 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जानेवारीमध्ये 21, फेब्रुवारीमध्ये 7, मार्चमध्ये 13, एप्रिलमध्ये 26 आणि मे महिन्यात 27 दहशतवादी ठार करण्यात आले.