बँक मनी लाँडरिंग प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने (ED) गुरुवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांची चौकशी केली. जम्मू -काश्मीर (J&K) बँकेच्या वतीने इमारत खरेदी केल्याच्या प्रकरणी अब्दुल्ला यांची ईडीने चौकशी केली. गुरुवारी दिल्लीत अब्दुल्ला यांची चौकशी करण्यात आली.
ही इमारत सुमारे १२ वर्षांपूर्वी विकत घेण्यात आली होती. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सकाळी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या मुख्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सक्तवसूली संचालनालयाने या वर्षाच्या सुरुवातीला या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने यापूर्वी जम्मू काश्मीर बँकेचे माजी अध्यक्ष मुश्ताक अहमद शेख तसंच इतरांवर कर्ज आणि गुंतवणूकीच्या मंजुरीत कथितरित्या केलेल्या अनियमिततेसाठी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या एफआयआरची दखल घेत, ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) चौकशी सुरू केली आहे.
२०२१ मध्ये, सीबीआयनं J&K बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापनाविरुद्ध २०१० साली मुंबईतील वांद्रे कुर्ला येथील मेसर्स आकृती गोल्ड बिल्डर्सकडून १८० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. यात कथितरित्या निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.