लोकसभा निवडणुकीदरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागातील जबलीपोरा येथे बुधवारी संध्याकाळी दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मजूर बिहारमधील बांका येथील रहिवासी होता. राजा साह असे त्याचे नाव असून नवादा बाजार सहाय्यक पोलीस स्टेशन हद्दीतील नवादा बाजार येथे राहत होता. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच आई नीरा देवी यांना मोठा धक्का बसला आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राजा साह याच्या मानेवर आणि पोटात दोन वेळा गोळ्या लागल्या होत्या. परप्रांतीय मजूर राजा साह हा अनंतनागच्या जबलीपोरा येथे कुटुंबासह भाड्याने राहत होता. बुधवारी संध्याकाळी काही दहशतवादी त्याच्या रस्त्यावरील दुकानाजवळ आले आणि गोळ्या झाडून पळून गेले. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
राजा साह याचे वडील शंकर साह यांचे 2011 मध्येच निधन झाले होते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी राजा साह आणि त्याचा मोठा भाऊ मिथुन यांच्यावर होती. मोठा भाऊ गावात राहतो आणि मोलमजुरी करतो. घरातील लोकांनी सांगितले की, राजा 10-12 वर्षांपूर्वी आपल्या एका नातेवाईकांसोबत जम्मू-काश्मीरला नोकरीसाठी गेला होता. सध्या तो जबलीपोरा, अनंतनाग येथे पत्नी आणि तीन मुलांसह राहायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.
घटनेनंतर राजा साहची आई नीरा आणि पत्नी सुमन देवी यांची प्रकृती वाईट असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकुश, विशू आणि छोटू अशी त्याला तीन मुलं आहेत. मुलं लहान असल्याने त्यांना नेमकं काय झालं आहे हेच कळत नाही. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.