तिरुवनंतपुरम- देशभरात कठुआ आणि उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणांमुळे संतापाची लाट उसळलेली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत समाजमाध्यमांवर आवाज उठवला जात आहे. मात्र असले तरीही काही लोकांकडून बुरसटलेल्या विकृत विचारांचे प्रदर्शनही यावेळी होत आहे. कोटक महिंद्र बँकेच्या एका असिस्टंट मॅनेजरने अशाच पद्धतीने केलेल्या एका ट्वीटमुळे त्याला कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय बँकेच्या प्रशासनाने घेतला आहे.
विष्णू नंदकुमार या पलारिवत्तोम येथिल शाखेच्या असिस्टंट मॅनेजरने हे ट्विट केले होते. कठुआ बलात्कार प्रकरणी लिहिताना त्याने ट्वीट केले होते, '' बरं झालं तिला या वयात ठार मारण्यात आलं, नाहीतर ती मोठी झाल्यावर आत्मघातकी हल्लेखोर बनून भारताविरोधात बॉम्ब टाकायला आली असती.''
हे ट्विट लवकरच समाजमाध्यमांमध्ये पसरले आणि संतापाची लाट उसळली. विष्णू नंदकुमार आणि कोटक महिंद्र बँकेवरही टीका होऊ लागली. त्याला कामावरुन काढून टाकण्यात यावे अशी मागणी समाजमाध्यमांतून अनेक लोकांनी केली. तसेच काही लोकांनी बँकेतील आपले खाते बंद करु असेही समाजमाध्यमांवर स्पष्ट केले होते. त्यानंतर त्याला कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय कोटक महिंद्र बँकेने घेतला आणि त्याच्या विधनाचा निषेधही केला. बँकेच्या या निर्णयानंतर समाजमाध्यमांमध्ये बँकेचे कौतुकही सुरु झाले.