नवी दिल्ली - बऱ्याच खासगी बँका आपले थकीत कर्ज वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सरचा वापर करत असतात. हे रिकव्हरी एजंट ग्राहकांना दमदाटी करून कर्जाची वसुली करतात. अशा रिकव्हरी एजंटबाबत केंद्रीय वित्तराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्राहकांकडून जबरदस्तीने कर्जवसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार बँकांना नाही, असे अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी बँकांचे रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर यांच्याबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ठाकूर म्हणाले, "ग्राहकांकडून कर्जवसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट आणि बाऊन्सर पाठवण्याचा अधिकार कुठल्याही बँकेला नाही. कर्जदारांशी योग्य व्यवहार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. बँकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे".
" ही मार्गदर्शक तत्त्वे कर्जवसुली करताना ग्राहकांचे शोषण करणे, वसुलीसाठी ग्राहकांना अवेळी त्रास देणे, बलप्रयोग करणे, अगा गोष्टी करण्यापासून बँकांना रोखतात,"अशी माहितीही ठाकूर यांनी दिली. तसेच योग्य पोलीस व्हेरिफिकेशन आणि अन्य औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच कर्जाच्या वसुलीसाठी बँका रिकव्हरी एजंट पाठवू शकतात, असे रिझर्व्ह बँकेचे दिशानिर्देश आहेत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.