लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लॉकर्समध्ये ठेवलेल्या वस्तूंची सुरक्षितता, त्यांची हानी न होणे वा त्या गहाळ होणार नाहीत याची असलेली जबाबदारी बँका टाळत असल्याची भावना ग्राहक हक्क तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही जबाबदारी टाळून बँका सेवेत त्रुटी ठेवत आहेत, असेही त्यांचे मत आहे. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील १९ बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकर्समधून बहुमोल वस्तू गहाळ झाल्यास त्याची कोणतीही भरपाई दिली जात नाही. लॉकर्समध्ये काय ठेवले आहे हे ग्राहक जाहीर करीत नसल्याचे कारण सांगून सरकारी आणि खासगी बँकांचे अधिकारी जबाबदारी ग्राहकांवर टाकत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॉकर फोडले गेल्यास, आग किंवा नैसर्गिक संकटांसह कोणत्याही कारणाने लॉकर्समधील वस्तूंची हानी झाल्यास आम्ही जबाबदार नसल्याचे रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील १९ बँकांनी सांगितले.ग्राहक हक्क तज्ज्ञ आणि कन्झ्युमर आॅनलाइन फाउंडेशनचे संस्थापक बिजोन मिश्र यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘‘सरकार, रिझर्व्ह बँक आणि बँकिंग उद्योग वर्तूळ ग्राहकांकडून वर्षाला शुल्कातून कमाई करून त्यांना दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी टाळू शकत नाहीत.’’
लॉकर्सच्या सुरक्षेबाबत बँकांचे हात वर
By admin | Published: June 29, 2017 12:25 AM