नवी दिल्ली : कर्जाची मागणी वाढवण्यासाठी बँकांनी व्याजदरात कपात करावी, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केले. बँकांना कमी रकमेच्या भरपूर ठेवी व रिझर्व्ह बँकेच्या पूर्वीच्या धोरणांचा फायदा झाला आहे, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, आम्ही रेपो दरात कपात केली आहे, तसेच बँकांजवळ रोख जमेचा जो पूर आला, त्याचा त्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे त्यांनी व्याजदर कपात करायला पाहिजे. बँकांना व्याजदर कपातीस वाव आहे, यावर भर देताना ते म्हणाले की, कर्जांवर व्याजदर कपातीची टक्केवारी फार कमी राहिली आहे. घरे, व्यक्तिगतसारख्या क्षेत्रांमध्ये पाहिले असता, इतर क्षेत्रांमध्ये त्याच बँकांनी अपेक्षेपेक्षा अधिक कपात केली आहे. ज्या क्षेत्रांमध्ये व्याजदर आणखी कपात करायला हवी आहे, तेथे ती होणे गरजेचे आहे. याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रेपोदर ६.२५ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ५.२५ टक्के कायम ठेवला आहे. जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत रेपो दरात १.७५ टक्के कपात केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)- रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करावेत, असे मला वाटते; परंतु रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा आदर करतो, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. सर्वच अर्थमंत्र्यांना व्याजदर कमी हवे असतात. परंतु आम्ही रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा आदर करतो, असे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पानंतर बाजार नियामक बोर्डच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
बँकांनी व्याजदर कपात करावी
By admin | Published: February 12, 2017 5:33 AM