कोलकाता - पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात स्टेज कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर, या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यामध्ये सुदैवाने बचावलेल्या रिता मुदीने नरेंद्र मोदींकडे ऑटोग्राफ मागितला. मोदींकडून ऑटोग्राफ मिळाल्याने रिता मुदी स्थानिक सेलिब्रिटी बनली. विशेष म्हणजे मोदींनी ऑटोग्राफ दिला अन् रिताला लग्नाचा प्रस्ताव आला, असचं काहीसं घडल आहे.
बांकुरा ख्रिश्चन महाविद्यालयात रिता पदवीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. राजधानी कोलकातापासून 230 किमीवर रिताचे गाव आहे. मोदींचा ऑटोग्राफ मिळाल्यानंतर रिता तिच्या गावात चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे तिला लग्नाचे अनेक प्रस्तावही आले आहेत. आतापर्यंत रिताला दोन कुटुबांनी लग्नाची मागणी घातली आहे. 16 जुलै रोजी रिता तिच्या आईसोबत पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मिदनापूरला गेली होती. त्यावेळी सभा ऐकण्यासाठी रिता तिच्या आईसमेवत एका तंबूखाली बसली होती. मात्र, दुर्दैवाने तो तंबू कोसळला. त्यामध्ये रिता जखमी झाले. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मोदींनी या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. त्यावेळी रिताने मोदींकडे ऑट्रोग्राफ देण्याची मागणी केली. हे पाहून मोदीही काहीक्षण गोंधळले. मात्र, अखेर मोदींनी रिताला ऑट्रोग्राफ दिला. रिता मुदी तुम सुखी रहो, असा संदेश मोदींनी या ऑटोग्राफसोबत लिहिल्याचे रिताने म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिताच्या घरी माणसांची वर्दळ सुरु झाली. एवढेच नव्हे, तर रितासाठी लग्नाचे प्रस्तावही आल्याचे रिताची आई संध्या यांनी सांगितले. मात्र, रिताला अजून शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यामुळे तिच्या कुटुबीयांनी लग्नाचा प्रस्ताव अमान्य केला.