नवी दिल्ली : सर्व अग्रगण्य ब्रेड कंपनीच्या नमुन्यांमध्ये कॅन्सरचे कारण ठरणारी रसायने आढळून आल्याचा निष्कर्ष अभ्यास सर्वेक्षणातून समोर आल्यानंतर खळबळ उडाली असताना मंगळवारी दुसऱ्या दिवशी सरकारने येत्या १५ दिवसांत पोटॅशियम ब्रोमेटचा अन्न पूरक घटक म्हणून वापर करण्यावर बंदी आणण्याची तयारी केली आहे. सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) अन्न पूरक घटक म्हणून समावेश असलेल्या यादीतून पोटॅशियम ब्रोमेटला वगळण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी देशाच्या अन्न नियामकाकडून अहवाल मिळताच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) ही बाब गांभीर्याने घेत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. या संस्थेकडून अहवाल मिळताच त्वरित कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाव आणि बनचा समावेश असलेल्या पाकिटबंद ब्रॅन्डच्या सहज उपलब्ध होणाऱ्या ३८ पैकी ८४ टक्के नमुन्यांमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट आढळून आले आहे. हे दोन्ही घटक सार्वजनिक आरोग्यासाठी घातक असल्यामुळे अनेक देशांनी त्यावर बंदी घातली असल्याचे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) एका अहवालात म्हटले होते. (प्रतिनिधी)सीएसईकडून शिफारशीचे स्वागत...अन्न नियामकाने (एफएसएसएआय) पोटॅशियम ब्रोमेटवर बंदी आणण्याची शिफारस केल्याबद्दल विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) स्वागत केले आहे. आम्ही प्राधिकरणाच्या कृतीची प्रशंसा करतो. लवकरच पोटॅशियम आयोडेटवरही बंदी आणली जाण्याची आम्हाला आशा आहे. त्यादृष्टीने मूल्यांकन केले जावे, असे सीएसई चे उपमहासंचालक चंद्रभूषण यांनी सांगितले.आरोग्य मंत्रालयाने सीएसईच्या अहवालाची बाब गांभीर्याने घेतली आहे. अधिकाऱ्यांना याप्रकरणी तातडीने अहवाल देण्याचा आदेश देण्यात आला असून लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आम्ही लवकरच तपास अहवाल समोर आणू.- जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्यमंत्री
ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेटवर बंदी
By admin | Published: May 25, 2016 1:58 AM