विकास मिश्रराजकोट : निवडणूक म्हटले की, बॅनर आणि पोस्टरबाजी असेच चित्र उभे राहते; परंतु गुजरात विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत मात्र असे असे पूर्वापर ठसलेले चित्र दिसत नाही. अहमदाबाद ते भूज, मांडवी, गांधीधाम या ७०० किलोमीटरच्या प्रवासात बॅनर, पोस्टर दिसून आले नाहीत. हलवद, भूज आणि मांडवी येथील भाजप कार्यालयात एकाच प्रकारची पोस्टर्स लागली आहेत. यात नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांंची छायाचित्रे आहेत. भूज वगळता अन्य कोठेही स्थानिक उमेदवारांचे फोटो दिसले नाहीत. राजकोटमध्ये भाजपच्या एका भव्य बॅनरमध्ये विकासाची गाथा सांगण्यात आली आहे, तर काँग्रेसचे बॅनर गरिबांना आकर्षित करीत आहे.काँग्रेस सोशल मीडियावर असली तरी काँग्रेसची कार्यालये दिसत नाहीत. उमेदवार घोषित करण्यात झालेला उशीर, हे यामागचे कारण सांगितले जाते. तथापि, आता घरोघरी प्रचार सुरू झाला आहे. विशेषत: कच्छ भागात उमेदवारांना चांगलाच घाम गाळावा लागणार असे दिसते. कारण या भागात दिवसा खूपच कडक ऊन असते. गावे एकमेकांपासून खूप दूर अंतरावर आहेत. मोरबीनजीक हलवद येथेही उमेदवार चांगलेच घामाघूम झालेले दिसले. मांडवी मतदारसंघातील काँग्रेसचे उमदेवार शक्तिसिंह गोहील सुरुवातीला गावागावांत प्रचार करण्यावर भर देत आहेत. विकासाची गंगा गावांत पोहोचली नसल्याने गावकरी निश्चित काँगे्रसला मते देतील, अशी त्यांना आशा वाटते.भूजहून रणकडे जाताना नंदीभाई आणि रवाभाई यांना यावेळी कोण जिंकणार? असे विचारले असता रवाभाई म्हणाले की, ज्याच्या हाती कारचे स्टिअरिंग, तोच कार चालवील. रस्ता दूरपर्यंत असल्याने आमचे गाव भाजपसोबत आहे.>कमी होऊ शकतात जागाभूज विधानसभा मतदारसंघातील नाथानीय गावाचे सरपंच सुरेश भाई छांगा हे आहेत. भाजपशी त्यांचा संबंध असला तरी त्यांना राज्यात यंदा भाजपच्या जागा घटण्याची शक्यता वाटते. तथापि, जागा कमी झाल्या तरी सरकार मात्र भाजपचेच येईल, असा दावाही त्यांनी केला.नाना प्रकारचे मेसेजभाजपने रुपानी, अमित शहा व मोदी यांच्या नावांतील अद्याक्षरांवरून ‘राम’चा नारा दिला आहे, तर दुसरीकडे हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश यांच्या नावातील अद्याक्षरांची जुळवाजुळव करून धार्मिक नारा देण्यात आला असून, ही धार्मिक घोषणा खूपच चर्चेत आहेत.>हार्दिकवर भरवसाअंजार ते राजकोट या मार्गावर अनेक ठिकाणी हार्दिक पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची पोस्टर्स दिसली. सरदार पटेल यांची कृपा हार्दिकवर होते की, नरेंद्र मोदींवर हे यथावकाश दिसून येईलच.सौराष्टÑातील काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो की, हार्दिक पटेल यांच्या पाठिंब्याने निवडणुकीची ‘नाव’ निश्चित तरेल. हार्दिकच्या नावावार पटेल समुदायाची मते काँग्रेसला मिळाल्यास अनेक जागांचे निकाल प्रभावित होतील.
बॅनर, पोस्टरपेक्षा प्रचाराचा खरा भर सोशल मीडियावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:11 AM