राजस्तानमधील बुंदी जिल्ह्यामध्ये नाता विवाह प्रथेतून घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका क्रूर पित्याने पैशांच्या हव्यासापोटी त्याच्या १७ वर्षांच्या मुलीचं तीन महिन्यांमध्ये तीन तरुणांशी लग्न लावून दिलं. पैशांसाठी हैवान बनलेल्या या पित्याने तिन्ही लग्न लावताना मुलीच्या तिन्ही पतींकडून बक्कर रक्कमही वसूल केली. हे तिन्ही तरुण या अल्पवयीन मुलीपेक्षा दुप्पट वयाचे होते. दरम्यान, ही तरुणी गर्भवती राहिली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीचे वडील, तिन्ही पती आणि आणखी एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुंदी जिल्ह्यातील हिंडोली ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. हिंडौलीचे ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी मुकेश मीणा यांनी सांगितले की, आरोपी वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीचा पहिला नाता विवाह २२ जानेवारी रोजी राजेश सैनी याच्याश लावून दिला. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी ओवण येथील बनवारी सैनी याच्याशी एक लाख २० हजार रुपयांची रक्कम घेऊन मुलीचं लग्न लावून दिलं.
त्यानंतर केवळ दहा दिवसांतच या मुलाचं लग्न कालूलाल सैनी याच्याशी लावून देण्यात आलं. सैनीकडून २ लाख १० हजार रुपये घेऊन मुलीचं त्याच्याशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. आरोपीने त्याच्या मुलीचं ज्या तीन जणांशी तिचं लग्न लावून दिलं, ते तिघेही तिच्यापेक्षा दुप्पट वयाचे होते. दरम्यान, त्यांनी या तरुणीला मारहाणही केली. ती गर्भवती राहिली. दरम्यान, गोविंद सैनी नावाचा तरुण तिला फूस लावून पळवून घेऊन गेला.
त्यानंतर ही तरुणी कशी-बशी तिच्या भाओजींकडे पोहोचली. त्यानंतर त्यांनी बालकल्याण समिती कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली. पीडितेची व्यथा ऐकून बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनाही धक्का बसला. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच पीडितेच्या वडिलांसह तिन्ही पती आणि तिला पळवून नेणारा तरुण यांच्याविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.