ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - गेल्या 17 वर्षात विडी-सिगारेट ओढणा-या भारतातल्या पुरुषांची संख्या 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. एका पाहणीत आढळलेल्या माहितीनुसार 1998 मध्ये विडी-सिगारेट ओढणा-या पुरुषांची (15 ते 69 वयोगट) संख्या7.9 कोटी होती, जी 2015 पर्यंत 2.9 कोटींनी म्हणजेच 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. याचा अर्थ भारतामध्ये दरवर्षी स्मोकर्समध्ये सरासरी 17 लाख पुरुषांची भर पडत आहे.
ही परिस्थिती चिंताजन असल्याचे तंबाखूशी संबंधित मृत्यूचे प्रमाण बघितल्यावर स्पष्ट होते. 2010 मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के किंवा 10 लाख मृत्यू धुम्रपानामुळे झाले होते. यापैकी 70 टक्के मृत्यू 30 ते 69 या वयोगटातील होते, असे या अहवालाचे लेखक प्रभात झा यांनी एका मासिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.
धुम्रपान करणा-यांची संख्या भारतापेक्षा केवळ चीनमध्ये जास्त आहे. 1998 ते 2010 या कालावधीत धुम्रपानाचा कल कसा होता याचा अभ्यास करण्यात आला आहे. एकूण तीन पाहण्यांच्या आधारे - ज्यामध्ये 1.4 कोटी भारतीयांची पाहमी करण्यात आली - हा अहवाल बनवण्यात आला आहे. विडीची जागा सिगारेट घेत असल्याचेही आढळले आहे. लोकसंख्यावाढ आणि वाढते उत्पन्न यामुळे विडीपेक्षा सिगारेटकडे कल वाढत असल्याचे झा सांगतात. धुम्रपान करणा-यांची सर्वाधिक म्हणजे 68 टक्के वाढ शहरी भागात आहे, तर ग्रामीण भागात हा दर 26 टक्के आहे.
महिलांनी धुम्रपान करण्याचे प्रमाणही या पाहणीत नमूद करण्यात आले आहे. भारतात एकूण 1.1 कोटी महिला धूम्रपान करतात. ही संख्या पुरुषांच्या तुलनेत 10 टक्के आहे. या पाहणीनुसार तरुण मुलींमध्ये सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण कमी वा जास्त झाले नसून जैसे थे अशी स्थिती आहे.