गुजरात : येथील जामनगरमध्ये गरबा खेळण्याचा सराव करणाऱ्या एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या मुलाचे वय फक्त १९ वर्षे होते. तो गरबा क्लासमध्ये गरबा खेळण्याचा सराव करत असल्याचं सांगण्यात येत आहे. खेळताना तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
विनीत मेहुलभाई कुंवरिया असे या मुलाचे नाव असून तो जामनगरमध्ये राहत होता. त्याचे मामा दर्शन जोशीपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनीत गेली तीन-चार वर्षे सातत्याने गरबा स्पर्धेत भाग घेत होता. नवरात्र येण्यापूर्वीच तो गरबा-दांडियाचा सराव सुरू करायचा. बुधवारी संध्याकाळीही तो सरावासाठी गेला होता. क्लासमध्ये तो आपल्या ग्रुपसोबत सराव करत होता. विनीतच्या मित्रांनी सांगितले की, तो अचानक बेशुद्ध झाला आणि जमिनीवर पडला. मित्रांनी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो शुद्धीवर आला नाही. मित्रांनी ऑटोमधून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणीनंतर विनीतला मृत घोषित करण्यात आले. त्याला हार्ट अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी जामनगरमधील एका कार्डियक डॉक्टरचे वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांच्याच रुग्णालयात निधन झाले. जीम, क्रिकेटचे मैदान, शाळा आणि रस्त्यावर उभे असताना लोकांना हार्ट अटॅक येत आहे. कोरोनानंतर हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे.